Wednesday, December 3, 2008

झरदारींनी घेतलेली भूमिका योग्यच

झरदारींनी घेतलेली भूमिका योग्यच

मुंबई हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर भारत सरकारने केलेली मागणी (याचना?) अस्थिर पाकिस्तानचे प्रधानमंत्री यांनी फेटाळून लावली. मागणी केलेल्या अनेक दहशतवादी हे पाकिस्तानात नाहीतच अशी भूमीका त्यांनी घेतली आहे.

झरदारींनी घेतलेली ही भूमीका अतिशय रास्त आहे याची जाणीव आपल्या राज्यकर्त्यांना अजून झाली नाही असे दिसते कारण सर्व दहशतवादी हे भारतात म्हणजेच पाकिस्तानने गिळंकृत केलेल्या आपल्याच देशातील काश्मीर या राज्यात आहे याचा विसर आपल्या राज्यकर्त्यांना झाला आहे का? भारतीय ताबारेषेपासून ते भारतीय सिमारेषेपर्यंत असलेल्या काश्मिरमध्ये यातील बरेचसे दहशतवादी सुखासमाधानाने कारवाया करीत आहे हे संपूर्ण जगाला माहित असलेले सत्य आहे.

भारतीय राज्यकर्त्यांनी शेजारील देशावर शिंतोडे (?) उडवून आपला राजकीय स्वार्थ साधण्यापेक्षा ताबारेषेपासून भारतीय सिमारेषेपर्यंत भारतीय सैन्याचा मार्च करावा. सर्व दहशतवादी संपवण्यात भारतीय सैन्याला फार काळ लागणार नाही. राहिला प्रश्र्न ताबारेषेचा, सर्व जगाला ओरडून सांगू की आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेपर्यंत सिमेवर आणि आशिया खंडात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या भागावर आमचे सैन्य असेल. अमेरीकेतील बुश तसेच आगामी ओबामा सरकारने "भारताला स्वसंरक्षणाचा हक्क आहे' असे केलेल्या वक्तव्याचा उल्लेख येथे केल्यावाचून राहवत नाही.

श्रीनिवास गणेश गर्गे
उद्योजक, नाशिक (महाराष्ट्र)
sggarge@gmail.com