Monday, December 13, 2010

नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांत

मुंबई धर्मप्रांतामधून 8 मार्च 1854 मध्ये पुणे कॅथलिक धर्मप्रांताची स्थापना झाली. येशू संघीय धर्मगुरुंना या धर्मप्रांताची जबाबदारी सोपविण्यात आली. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक असे आठ जिल्हे त्यांच्या अधिपत्याखाली होते. प्रथम रा.रेव्ह. बिशप हेन्री डोरिंग ये.सं, रा. रेव्ह. बिशप एन्ड्रू डिसूजा, रेव्ह बिशप विल्यम गोम्स यांनी या धर्मप्रांताचे काम पाहिले. तदनंतर 1977 मध्ये रा.रेव्ह. बिशप व्हलेरीयन डिसूजा यांनी या धर्मप्रांताची धुरा स्विकारली. प्राशासकीय दृष्ट्या आठ जिल्ह्याचा कारभार सांभाळणे कठीण असल्यामुळे त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव आणि नंदुरबार हा विभाग 1987 मध्ये विभाजन करून पोप महाशयांच्या परवानगीने नाशिक कॅथोलिक धर्मप्रांत अलग झाला.
या धर्मप्रांतात विशेषतः भूमीहिन, अल्पभुधारक, कामगार वर्ग काही अंशी सरकारी सेवेत असलेले परंतू बहुतांशी लोक हे दारिद्र्य रेषेखालील होते.
वरील परिस्थितीचा आढावा घेऊन पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 9 जून 1987 रोजी फा. थॉमस भालेराव येशू संघीय यांची बिशप म्हणून नेमणूक केली आणि तेव्हांचे बिशप सायमन कार्डिनल पिमेंटा (मुंबई धर्मप्रांताचे आर्च बिशप) यांनी 23 ऑगस्ट 1987 रोजी ज्ञानमाता विद्यालय, संगमनेर येथे दिक्षा दिली. बिशप भालेराव यांनी यशया 61;6, मत्तय 28;19, प्रे.कृत्ये 10;12 या अन्वये ‘दिनांस सुवार्ता घोषवावी’ हे धर्मप्रांतासाठी आपले ध्येयवाक्य स्वीकारून कार्यास शुभारंभ केला.
या दिवसाची दलित ख्रिश्र्चनांच्या इतिहासात एक सुवर्ण घटना म्हणून नोंद केली गेली. समाजाच्या आशा, आकांक्षा, स्वप्ने व आध्यात्मिक विकास साधण्याची एक अपूर्व संधी त्यामुळे उपलब्ध झाली. या धर्मप्रांताच्या ख्रिस्ती धर्मीयांची संख्या 1 लाख 10 हजार च्या आसपास आहे. येशू संघीय, सलेशियन्स, फ्रान्सिकन, कॅप्युचिअन, डॉमनिकन्सय आणि धर्मप्रांतीय धर्मगुरु, धर्मबंधू मिळून 169 जण, विविध 283 धर्मभगिनी या कार्यात कार्यरत आहेत. या धर्मप्रातांत 33 धर्मग्रामे, 12 उपधर्मग्रामे आणि 522 मिस्सा केंद्रे आहेत.
विद्येशिवाय माणूस पशू. म्हणून मिशनसाठी सुरवातीपासूनच शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. प्रत्येक धर्मग्रामात शाळा सुरु केल्या. पाच-दहा विद्यार्थ्यांनी सुरु झालेल्या शाळा आज हजारोंच्या संख्येने फुलल्या आहेत. धर्मप्रांतात दोन उच्च माध्यमिक विद्यालये असून, त्यात 450 ते 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या 23 माध्यमिक शाळा असून सुमारे 12 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
याशिवाय परिचारीका प्रशिक्षण, बालवाडी प्रशिक्षण, गृहिणी कल्याण केंद्र, जनसेवा मंडळ, अनौपचारीक शिक्षण, गृहोद्योग शिक्षण, शिवणकाम, एम्ब्रोडरी वर्ग, शिशुविकास केंद्र, कायदाविषयक सल्ला, सामाजिक शेती केंद्र, ग्रामीण विकास केंद्र, महिला बचतगट इत्यादी समाजकल्याण उपक्रम राबविण्यात एकूण 25 पेक्षा अधिक संख्या आहेत. यापैकी नाशिक सोशल सर्व्हिस सोसायटी, सोशल सेंटर, इंडोजर्मन वॉटर अण्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, वॉटर रोड, प्रबोधन सेवा मंडल, आशांकुर इत्यादी अनेक संस्था कार्यरत आहेत.
आरोग्याच्या बाबतीत धर्मप्रांतामध्ये उल्लेखनीय कार्य सतत सुरु असते. धर्मप्रांतात चार मोठ्या रुग्णालयांबरोबर 15 डिस्पेन्सरीज्‍ आहेत. कुपोषित बालकांसाठी विशेष मोहीम राबविली जाते. मोफत आरोग्य शिबीरे, एड्सक रुग्णांसाठी उपचार व प्रबोधन केंद्रे चालविली जातात.
धर्मप्रांतात 45 वसतिगृहे चालविली जात असून सुमारे दोन हजार 802 लाभार्थी आहेत. या वसतिगृहातून फक्त शालेय विद्यार्थीच नव्हे तर महाविद्यालयीन विद्यार्थी आय.टी.आय., डी.एड.,बी.एड करणारे घरापासून दूर राहून नोकरी करणार्याआ मुलींचीही सोय केली जाते. अशा प्रकारे एक ना अनेक विविध उपक्रम धर्मप्रांतात राबविले जातात.
अशा या नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताच्या उन्नतीची अहोरात्र काळजी घेणारे, देवाच्या कृपा आशीर्वादात आमचे आत्मिक पालनपोषण व्हावे म्हणून तळमळीने मार्गदर्शन करणारे, आमचे ख्रिस्ती जीवन समृद्ध व्हावे म्हणून देवाकडे कळकळीने प्रार्थना करणारे आणि उत्तम मेंढपाळाचा वसा घेतलेले महागुरु थॉमस भालेराव नाशिक धर्मप्रांताला देवाकडून मिळालेली देणगी होती. आपल्या आयुष्याची 74 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणि प्रकृती काही प्रमाणात साथ देत नसल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी तो 1 एप्रील 2007 रोजी स्वीकारला. आणि पुण्याचे बिशप व्हॅलिरियन डिसूजा यांच्याकडे नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताची प्रशासकीय जबाबदारी सोपविली. तद्नंकतर तब्बल नऊ महिन्यानंतर 16 जानेवारी 1908 रोजी पोप बेनेडिक्ट 16 वे यांच्याकडून मॉन्सिनी यॉर फेलिक्स मचाडो यांची नेमणूक केली.
त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार 8 मार्च 2008 रोजी स्वीकारला. आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते म्हणतात ‘माझी नियुक्ती हा परमेश्र्वरी सांगावा आहे’ पुढे ते म्हणाले ‘नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांतांत काम करतांनाही ख्रिस्ती बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार नियोजन करणार आहे’. प्रभू येशू हा योग्य पद्धतीने काळजी घेणारा उत्तम मेंढपाळ आहे असे मी समजतो. त्याप्रमाणे आदर्श मेंढपाळ बनून कामकाज करण्याचा माझा प्रयत्न राहील. ‘प्रीतीच सर्व श्रेष्ठ’ हे ध्येय वाक्य निवडून आपले इप्सित पूर्ण करण्यास त्यांनी प्रारंभ केला. प्रथम सर्व धर्मप्रांतातला त्यांनी भेटी दिल्या त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. धर्मगुरुबरोबरच धर्मग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्याही अपेक्षा जाणून घेतल्या. धर्मप्रांत पातळीवर स्कुल कमिटीची स्थापना करून शालेय प्रश्र्न सोडविण्यास चालना दिली. धर्मप्रांताची आर्थिक सल्लागार समिती स्थापन करून धर्मगुरु बरोबरच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी ही त्यावर घेतले. त्यांच्या पारदर्शक कारभाराचे चित्र त्यामुळे स्पष्ट होते. 1993 ते 2008 व्हॅटीकनने स्थापन केलेल्या आंतरधर्मीय सुसंवाद आयोगाचे जागतिक प्रमुख म्हणून पोप जॉन पॉल द्वितीय यांच्याकडून नियुक्ती झाली होती. नाशिक धर्मप्रांतासाठी त्यांची नियुक्ती सुयोग्य होती. धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या नाशिकचे स्थान मोठे आहे. येथे विविध धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. आर्चबिशप फेलिक्स यांच्या व्यापक व प्रदिर्घ अनुभवामुळे येथील धार्मिक सुसंवाद व सामंजस्याच्या कार्यात मोठाच हातभार लागला होता.
अल्पावधीतच म्हणजे 10 नोव्हेंबर 2009 रोजी परमगुरु बेनेडिक्ट सोळावे यांनी आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांची वसई धर्मप्रांताचे बिशप म्हणून नेमणूक केली आणि नाशिक धर्मप्रांतासाठी अमरावतीचे बिशप लुर्डस डॅनिएल यांची प्रभारी बिशप म्हणून नेमणूक केली. 1 वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर 11 नोव्हे 2010 रोजी प्रभारी बिशप लुर्डस डॅनिएल यांना नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे अधिकृत बिशप म्हणून पोप बेनेडिक्ट 16वे यांनी व्हॅटिकन सिटीमधून घोषणा केली.
बिशप लुर्डस डॅनिएल यांचा जन्म 19 फेब्रु 1947 रोजी पुणे येथे झाला. येथील गॅरीसन हायस्कुल सध्याचे सेंट ज्युडस्‍ स्कुल येथे त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. पुणे विद्यापीठातून ते पदवीधर झाले. धर्मगुरुंचे प्रशिक्षण तत्वज्ञान आणि इशज्ञानाचा अभ्यासक्रम त्यांनी संत पायस 10वे कॉलेज, मुंबई येथून पूर्ण केले आणि 19 एप्रिल 1980 रोजी धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. आध्यात्म विद्यापीठ, बंगलोर येथे अध्यात्म विषयाचा सखोल अभ्यास त्यांनी केला.
धर्मगुरु म्हणून अनेक धर्मग्रामातून त्यांनी प्रेषितीय कार्य केले. सेंट जॉन्सय चर्च, अहमदनगर येथे उपधर्मगुरु तर सेंट इग्नेशिअस चर्च खडकी आणि नित्य सहाय्य करणारी माता चर्च पुणे येथे प्रमुखगुरु म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला. तद्नंडतर पेपल सेमिनरी पुणे येथे आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून यशस्वी कामकाज केले. पुढे त्यांना पुणे धर्मप्रांताचे व्हिकर जनरल तद्नंरतर मायनर सेमिनरी पुणे येथे रेक्टर अशी एकाहून एक महत्वाची पदे सांभाळावी लागली. या सर्व जबाबदार्याे त्यांनी यशस्वी पार पाडल्यानंतर 3 वर्षांपूर्वी पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमरावती कॅथलिक धर्मप्रांताचे बिशप म्हणून नियुक्ती केली.
‘माझ्या कळपाचे प्रतिपालन कर’’ प्रभूची ही आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या मेंढपाळ कार्यास हे ध्येयवाक्य निवडून धडाडीने आपल्या कार्यास सुरुवात केली. पुणे आणि नाशिक धर्मप्रांतापेक्षा लहान धर्मप्रांत असला तरी मोठ्या जोमाने ते कार्यास लागले. धर्मप्रांतातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना आपलेसे केले. आमची सुखदुःखे जाणणारा आहे या भावनेने प्रापंचिक भारावून गेले.
आजच्या जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यासाठी इंग्रजी भाषेची अत्यंत आवश्यकता आहे याची जाणीव होऊन येथील सामान्यांसाठी त्यांनी इंग्रजी माध्यमाला शाळा उघडण्यास प्रोत्साहन दिले जेणेकरून सर्वधर्म समभाव राखला जाईल.
तद्वत या भागात सोशल सर्व्हीस सेंटरची आवश्यकता आहे. लोकांचे प्रबोधन होणे ही काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे रोजगार मार्गदर्शक हेल्थसेंटर, महिला सबलीकरण इ. अनेक योजना सुरु केल्या.
बिशप लुर्डस डॅनिएल यांचा नम्र स्वभाव, परमेश्र्वरावर संपूर्ण विश्र्वास, प्रार्थनामय पवित्रजीवन व अगदी साधी राहणी, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती, गरीबाविषयी कळवळा आणि सर्वांत महत्वाचे ‘मी प्रभुचा सेवक आहे व त्याची आज्ञा आहे ‘माझ्या कळपाचे प्रतिपालन कर’ म्हणून त्यापूर्तीकडे सर्वस्व वाहून घेण्याची वृत्ती यामुळे ते अमरावती धर्मप्रांतामध्ये ख्रिस्ती भाविकांचे नव्हे तर ख्रिस्तेतर भाविकांची मने त्यांनी जिंकून घेतली व प्रेमाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहचवला.
त्याठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवतात तोच त्यांची नाशिक धर्मप्रांताची प्रभारी बिशप म्हणून नेमणूक करण्यात आली आणि गेले एक वर्ष दोन्ही धर्मप्रांत त्यांनी अतिशय प्रभावीपणे सांभाळले. पोप बेनेडिक्ट 16 वे यांनी 11 नोव्हे 2010 रोजी त्यांची नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे बिशप म्हणून नियुक्ती केली. बिशप पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. जेलरोडच्या सेंट फिलोमिना हायस्कुलच्या मैदानावर सकाळी 11 वाजता जाहीर कार्यक्रमात हे पदग्रहण होईल. कार्यक्रमासाठी मुंबईचे कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशस, पुणे धर्मप्रांताचे बिशप थॉमस डाबरे, सेवानिवृत्त बिशप व्हलेरीयन डिसूजा, वसई प्रांताचे आर्चबिशप फेलिक्स मच्याडो व इतर बिशपस्‍ तसेच अमरावती, पुणे, नाशिक आणि इतर धर्मप्रांतातील धर्मगुरु, धर्मभगिनी आणि भाविक हजारोंच्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.

- रेव्ह. फा. विल्सन रॉड्रिग्ज